राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत दुर्दैवी विमान अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण राज्याला मोठा हादरा बसला आहे. अजित पवार यांचा विमान अपघात यावर अनेक शंका उपस्थित होत असताना आता आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने एकच खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार हे आज पत्रकार परिषद घेणार आहे. आज ४ वाजता मुंबईत त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.
रोहित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट
बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार या पत्रकार परिषदेत विमान अपघाताचा तांत्रिक घटनाक्रम, हवामानाचा अहवाल आणि विमान उड्डाणापूर्वीचे काही संशयास्पद तपशीलबद्दल भाष्य करण्याची शक्यता वर्तवली आहे. रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादांच्या अपघातामागे काही राजकीय षडयंत्र होते की केवळ तांत्रिक चूक, यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.