राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बीड आणि पुणे या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार? याची राजकीय चर्चा सुरू झाली होती. बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून बीड आणि पुण्याचे पालकत्व आजपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राहणार आहे
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अर्थ खाते वगळून अजित पवारांकडे असलेल्या सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली जाणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. त्यामुळे,आता पुणे आणि बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या अनुषंगाने चर्चा होत असातनाच त्याचीही माहिती समोर आली.
पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आली असून शासनाने परिपत्रक जारी करत ही माहिती दिली. दरम्यान, सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारीला मंत्रालयीन कार्यालयात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. मंत्रालयातून अजित पवार राज्यभरातील आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देत होते.