संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असा प्रयत्न केला जात आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न केली जात आहेत.
बारामतीची पोटनिवडणुक ही बिनविरोधच व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. निवडणुकीत काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी, फोनाफोनी सुरू होती, आता अखेर आज दुपारी काँग्रेस आपला अर्ज परत घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस उमेदवार बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेईल, अशी विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा करत विनंती करत बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हटले, त्याचबरोबर काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबतं देखील सुरू झाली आहेत. तर या सर्व घडामोडींवरती भाष्य करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीत लढवत आहेत, तेथील एकूण परिस्थिती पाहता आणि आमच्या सगळ्यांची भावना लक्षात घेता तिकडे या निवडणुकीमध्ये पुढे जाणं थांबावं अशा प्रकारची भावना भूमिका दिसली, त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांचं एकमत झालं आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे, प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत, कदाचित मलाही फोन येईल, विचारणा होईल आणि त्यांच्या कानावर टाकूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
माघारीची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली असली तरी, कॉंग्रेसचा अधिकृत निर्णय झालेला नाही अशी माहिती समोर आली आहे. बारामती पोटनिवडणूकीची उमेदवारी मागे घेण्याबाबत कॉंग्रेसमध्येच असमन्वय असल्याचं दिसून येत आहे. कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय येण्याआधीच विजय वडेट्टीवारांनी परस्पर बारामती पोट निवडणूकीतून माघारीची घोषणा केली. सध्या मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते यांची चर्चा सुरु आहे.