उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अजित दादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या असून, उद्या मुंबईमध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांच्याच नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे.
मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले ?
‘अजितदादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले ते पाहून झोप उडाली. शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे. उद्या विधान मंडळाचे सदस्य आहेत. त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधान मंडळ प्रमुखपद अजितदादांकडे होतं, ते पद कोणाकडे द्यायचं? याबाबत निर्णय होईल. सुनेत्रा ताईंकडे पद देण्याची मागणी आहे. ते रास्त आहे. टीव्हीलाही मी ऐकत आहे. ते काही चूक आहे असं वाटत नाही. त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. बैठकीत तो निर्णय होईल.
अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील जी कामं आहेत, त्यावर लक्ष देत आहोत. उपमुख्यमंत्री पदाची जागा खाली आहे, ती सुनेत्रावहिनींद्वारे भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. पुढं लोकं जे ठरवतील त्याप्रमाणं होईल. उद्याची बैठक विधिमंडळ पक्षप्रमुख ठरवण्याची होईल. कदाचित एकमत झालं आणि व्यवस्थित झालं तर उद्याच्या उद्या शपथविधी होऊ शकतो, असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.