उपमुख्यमंत्री अजित पवारांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. यानंतर या अपघातावर शंका उपस्थित करत आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अजित पवारांचा मृत्यू घातपात आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक मोठ्या नेत्यांकडून हा संशय व्यक्त केला जात आहे.
विमान अपघातात आधी सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं, तर मग पाच जणांचे मृतदेह कसे सापडले, असा प्रश्न राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. या सगळ्या शंकांबद्दल भाजपचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आज आपलं मत मांडलं असून या घटनेला विनाकारण वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न होत आहे, असं ते म्हणाले.
उज्ज्वल निकम म्हणाले की, “विमानाने प्रवास करताना प्रत्येक गोष्टीची नोंद असते. एखाद्या खासगी विमानाने प्रवास केला जातो, तेव्हा विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे त्याची रीतसर नोंद असते. मात्र, त्या विमानात ६ प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही.” विमानात इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आग लागल्यानंतर मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले होते. जर कोणी यामागे कट असल्याचे म्हणत असेल, तर कायद्यानुसार तो सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्याची गरज असते. केवळ संशय व्यक्त करून एखाद्याच्या निधनासारख्या गंभीर विषयाला वेगळी कलाटणी देणे चुकीचे आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.
तसेच खासदार संजय राऊत यांनी जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित केल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी वस्तुस्थिती मांडली. जस्टिस लोया हे एका लग्नकार्यासाठी नागपूरला गेले होते. त्या रात्री त्यांच्यासोबत जे इतर न्यायाधीश उपस्थित होते, त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या बोललो होतो. त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच झाला होता. परंतु, अशा संवेदनशील विषयावर राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.