राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान दुर्घटनेबाबत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. खराब लेअरजेट विमान त्यांना जाणूनबुजून देण्यात आले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
व्हीएसआर कंपनीचे मालक अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या जवळचे असून, या कंपनीला राजकीय मदतीचा संशय त्यांनी व्यक्त केला.अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज बारामतीत पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
रोहित पवार काय म्हणाले?
'व्हीएसआर कंपनीकडून हलगर्जीपणा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक रिपोर्ट आला होता. रिपोर्ट आल्यानंतर काल आम्ही मुंबई पोलिसांमध्ये तक्रार केली. बारामतीत गर्दी होईल म्हणून मुंबईत तक्रार केली. पण त्यांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. मुंबईत बीएनएसएसनुसार झिरो एफआयआर दाखल करता येतो. व्हीएसआरकडे लिअरजेटची ७ विमाने होती, त्यापैकी दोन विमानांचा अपघात झाला आहे. व्हीएसआर नियम पाळत नव्हती, असा डीजीसीएनेच ठपका ठेवलाय. व्हीएसआरची विमाने खराब होती तर दादांना ते का दिलं'? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. तसेच 'व्हीएसआर कंपनी, मालक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा', अशी मागणी देखील आमदार रोहित पवारांनी केली आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, 'मुंबईत FIR दाखल होऊ शकला असतापण केला नाही. कुठल्याही नागरिकाला एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे. ललिताकुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. FIR कुणालाही दाखल करता येतो, असा सुप्रीम कोर्टाचाच निकाल आहे.