२३ एप्रिल २०२६
मुंबई : राज्यात होत असलेल्या बारामती (Baramati) पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सुनेत्रा पवार यांनी भल्या सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावत सर्व बारामतीकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक होत असून पवार कुटुंब या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याच पाहायला मिळालं. शरद पवार आज स्वत: मतदानाला उपस्थित नसले तरीही त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांना मतदान करण्याचं आवाहन बारामतीकरांना केलंय.
त्यामुळे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात असलेले पवार कुटुंब या निवडणुकीत एकत्र दिसून आलं. मात्र, 2029 च्या निवडणुकीची देखील चर्चा या अनुषंगान होत आहे. त्यातच, युगेंद्र पवार यांनी 2029 च्या निवडणुकीसंदर्भाने मोठं वक्तव्य केलंय. रोहीत पवार यांनी 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली.
2029 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात, जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते असं जे रोहित पवार म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख आहे. पण, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहेत. आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही, अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार यांनी परखडपणे भूमिका मांडली.
काय म्हानाले रोहित पवार
जय पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, 2029 मध्ये मी विधानसभेचा उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते, ते ऐकावं लागतं, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाकडून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यावेळी सुनेत्रा काकी निवडणुकीला उभं राहणार नसतील तर, जे कोणी उभं राहील, 2029 ला तसं बघितलं तर सर्वपक्षीय लढाई होऊ शकते.
बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असे रोहित पवार यांनी सांगितले. रोहित पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी मतदान केलं, त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बारामतीत 2029 ला पवार विरूध्द पवार (Pawar VS Pawar) अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
Copyright ©2026 Bhramar