अजित पवारांचं काही दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१० फेब्रुवारी) सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदाचा पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलया नंतर आमदार रोहित पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.आमदार रोहित पवारांनी सूचक प्रतिक्रिया देत राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत भाष्य केलं. सुनेत्राकाकींनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही विराजमान व्हावं, काहींची इच्छा नसली तरी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांचे ट्टीट
ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज मा. सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे. अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा! तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे.