गेल्या काही दिवसांपासून मराठवाडात पावसाने प्रचंड हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि इतर मंत्री आज मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत.
या अतोनात नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना २२०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या मदतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी २२०० कोटीची मदत केली असल्याचं सांगितलं, परंतु मदत कोणत्या दराने दिली हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं.
३१.५ लाख शेतकऱ्यांना २२१५ कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी ७००० रु दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ८५०० प्रती हेक्टर म्हणजेच ३४०० रु. एकरी याप्रमाणे देण्यात आली. एकरी ३४०० रुपयात काय होणार आहे? तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी आणि सोफा २० लाखाचा आणि आमच्या उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी ३४०० रु. मदत… एवढ्या अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का?
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि इतर सर्व मंत्री हेक्टरी ५० हजार रु. मदत देणार की नाही, यावर बोलायला तयार नाहीत. आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रु. मदत द्यावी…!