महाराष्ट्रामध्ये भोंग्यांचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते अशा अनेक तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार धार्मिक स्थळांवर भोंग्यांचा वापर रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत करू नये असे सांगण्यात आले आहे. तर दिवसामध्ये अधिकतम ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल ही ध्वनी मर्यादा निश्चित केली आहे.
महाराष्ट्र सरकारने ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी पाऊलं उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत याबाबत मोठी माहिती दिली. राज्यातील धार्मिक स्थळांवरून एकूण ३,३६७ भोंगे काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यामधील १,६०८ भोंगे हे एकट्या मुंबई शहरातील आहेत. ही संपूर्ण कारवाई अगदी शांतीपूर्व करण्यात आली. यामुळे कोणताही सांप्रदायिक किंवा धार्मिक वाद निर्माण झाला नाही.
मुख्यमंत्र्यानी विधानसभेत सांगितले की, पोलिसांना नियमाचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोणतेही धार्मिक स्थळ परवानगीशिवाय भोंगे पुन्हा लावत असेल तर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार असतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतमध्ये १,६०८ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत. यामध्ये १,१४९ मशिदींचा समावेश आहे. तर ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारा यांचा देखील समावेश आहे. या निर्णयामुळे मुंबई आता पूर्णपणे भोंगेमुक्त झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्यातील एखाद्या धार्मिक स्थळांवर जर भोंगा लागला तर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील भोंगे काढण्याबाबतच्या सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे विधिमंडळातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.