जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली.
पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले 18 प्रकारचे सर्व व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. यानंतर अमित शाह यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत.
अमित शाह यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.
नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाहीय.
योगेश कदम काय काय म्हणाले?
सध्या महाराष्ट्रात 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिक आहेत. यातील एक कॉलम अनट्रजसेबल पाकिस्तानी नागरिकांचा आहे. ज्यांच्या व्हीजाची मुदत संपलीय. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना परत पाकिस्तानला पाठवायचे आहे, पण त्यांच्याशी संपर्क होत नाहीय किंवा ते सापडत नाहीयेत अशी हे पाकिस्तानी लोक आहेत, असं योगेश कदम यांनी सांगितले. सार्क व्हीजा आणि शॉर्ट टाईम व्हीजावर असलेल्यांना मात्र दोन दिवसांत म्हणजे 28 तारखेपर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आलंय. जे वैद्यकीय उपचारांसाठी आहेत त्यांना दोन दिवस वाढवून देण्यात आलेत . त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत देश सोडायचा आहे.
राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणं अजुन सुरु आहे. त्यामुळे आकडेवारी बदलू शकते, असंही योगेश कदम म्हणाले.