गुरुवारी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेले भांडण उभ्या महाराष्ट्राने पाहिले. गुरुवारी झालेल्या या वादाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. जितेंद्र आव्हाड यांनी येत असलेल्या धमक्यांचा प्रश्न मांडला. विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाचा आणि आव्हाडांच्या धमकीच्या मुद्द्याचा एकमेकांशी संबंध नाही, असा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला. यावर विरोधकांनी गदारोळ करताच देवेंद्र फडणवीस हे संतापल्याचे पाहायला मिळाले.
जनता शिव्या देतेय म्हणतेय सगळे आमदार माजलेत
धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मनाई नाही. अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी आपण राजकारणापलीकडे जाणार आहात की नाही? धमकीचा विषय वेगळा मांडता येईल. कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही. इथल्या बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. जनता शिव्या देतेय म्हणतेय सगळे आमदार माजलेत. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहे, त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते, हे सगळे आमदार माजले आहेत. त्यामुळे या गोष्टी गांभीर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करुन आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत. अशाप्रकारे समर्थन करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.