मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडले आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यात त्यांनी कोणते विभाग अव्वल स्थानावर, कोणाची किती टक्के कामे पूर्ण झाली आहेत, याबद्दलची माहिती सांगितली आहे. या यादीत एकूण राज्यातील ४८ विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. सविस्तर माहिती तुम्हाला http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.