महाराष्ट्राच्या राजकारणावर तब्बल तीन ते चार दशके गारूड निर्माण करणाऱ्या अजित पवार यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आज कायमचे शांत झाले. रुग्णालयातून निघालेली अजितदादांची अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आली आणि कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला. एकच वादा, अजितदादा, परत या… परत या… अजितदादा परत या… असा टाहोच कार्यकर्त्यांनी फोडला. अनेकजण धायमोकलून रडत होते. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला संपूर्ण जमावच हेलावून गेला होता.
अजितदादा यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आलं. विधीवत मंत्रोच्चारानंतर दादांना शासकीय सलामी देण्यात आली. त्यानंतर दादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि त्यानंतर धाकटे चिरंजीव जय पवार यांनी दादांना मुखाग्नी दिला. अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि जनसागराच्या साश्रू नयनांच्या साक्षीने हा जननेता अनंतात विलीन झाला. या दुःखद प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस दलाने हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अंतिम मानवंदना दिली. तिरंग्यात लपेटलेल्या आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. एक कर्तबगार लोकनेता, खंबीर प्रशासक आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला हा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला असून, राज्याच्या राजकीय इतिहासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाची सांगता झाली आहे.केवळ बारामतीच नव्हे, तर आज अवघा महाराष्ट्र आपल्या या लाडक्या लोकनेत्यासाठी हळहळत आहे.
ज्या कणखर नेतृत्वाने राज्याला दिशा दिली, ते शरीर पंचतत्त्वात विलीन होत असताना उपस्थित जनसमुदायाने “अजित दादा अमर रहे” अशा घोषणा दिल्या. आपल्या पित्याचा हा अखेरचा प्रवास पाहताना दोन्ही पुत्रांना आपले अश्रू अनावर झाले होते, त्यांच्या या अवस्थेने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले.