अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये शंकेचं काहूर माजलं आहे. अजित पवारांचा घातपात झाल्याचाही संशय राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची कठोर चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावीच, पण त्याचसोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.
अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्त्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला. अशी कामं करण्यामध्ये इस्त्रायलचा एक एजंट कुशल होता. एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा. अजितदादांच्या अपघातासंबंधी असाच काही प्रकार घडलाय का याचा तपास व्हावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.
रोहित पवारांकडून गंभीर प्रश्न उपस्थित
१. विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद केला होता?
२. त्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का? मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं काय?
३. टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाचे पाहणी झाली होती का? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे?
४. विमानाचा रूटिन मेंटेनन्स झालं नव्हतं का? ते कुणी केलं होतं? विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठे आहे?
५. विमानाचा हेव्ही मेंटेनन्स कधी झाला होता? त्याचा अहवाल कुठे आहे?
६. दादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का?
७. हे विमान पुढे वाराणसीला जाणार होतं. त्याचं भाडं बुडू नये म्हणून घाईगडबड केली का ?
८. विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं, मग तिथे EGPWS इशारा दिला होता की नाही? त्याचा अलर्टचा आवाज का आला नाही?
९. कंपनीला हेव्ही बेस मेंटेनन्स करता येत नव्हतं का? तसा अहवाल कुणी दिला?
१०. विमानात काय बिघाड झाला होता त्यामुळे ते एका बाजूला कललं?
रोहित पवार पुढे म्हणाले , या व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही. खर्च वाचावा म्हणून VSR कंपनी बऱ्याचदा अतिरिक्त इंधन न्यायचे अशी खात्रीलायक माहिती आहे. असे पेट्रोल जर विमानात ठेवण्यात येत असेल तर ते विमानासाठी बॉम्बच असू शकेल.या कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा अशी आमची मागणी आहे.
रोहित पवार यांनी दावा केला की, "पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसात दादांनी प्लॅस्टिक बाटली वापरण्याचं बंद केलं होतं. त्यांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरूवात केली आणि ती बाटली नेहमी त्यांच्या विश्वासू सुरक्षारक्षकाच्या हाती असायची असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी असं का केलं, त्यांना काही कुणकुण लागली होती का? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.