'मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार?' शरद पवारांचा थेट सवाल; नेमकं प्रकरण काय ?
'मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार?' शरद पवारांचा थेट सवाल; नेमकं प्रकरण काय ?
img
वैष्णवी सांगळे
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत दिवंगत अजितदादा पवार अनुकूल होते आणि १२ फेब्रुवारी रोजी तशी घोषणा होणार होती असा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही. महापालिका निवडणुकीपूरताच हा निर्णय झाल्याचे दादांच्या राष्ट्रवादी गटाचे म्हणणे आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा झाली असती तर मित्र पक्ष म्हणून अजितदादांनी आम्हाला सांगितले असते, असे वक्तव्य केले होते. या संपूर्ण प्रकरणावर आज शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला. 

विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेही नव्हते असा उल्लेख करत त्यांना बोलण्याचा काय अधिकार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, राष्ट्रवादी विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा काय अधिकार आहे हे मला समजले नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे मला माहिती नाही. आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार हे विलीनीकरणावर चर्चा करत होते. सध्या विलीनीकरणावर राजकीय चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

तर सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, त्यांना संधी दिली हा आनंद आहे. शपथविधीबाबत मला भाष्य करायचे नाही. अजितदादांच्या स्मारकाबाबत मला माहिती नाही. मी ते पेपरमध्ये वाचले. परंतु मला काही कल्पना नाही. ज्या संस्थेच्या जागेची चर्चा लोकांनी केली आहे. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे मला ठाऊक असले पाहिजे. अद्याप त्याबाबत आम्ही चर्चाही केली नाही. आम्ही संस्थेचे सर्व एकत्रित बसून त्यावर चर्चा करू. त्यामुळे आज अजित पवारांच्या स्मारकावर भाष्य करणे योग्य नाही असं शरद पवारांनी सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
“चर्चा कुठल्याही अंतिम टप्प्यावर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं. आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितलं असतं. ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी या गोष्टी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group