उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यनंतर अनेक लोक शंका उपस्थित होत आहे. अजित पवारांचा विमान अपघात हा अपघात नसून घातपात आहे असा संशय अनेक नेत्यांनी देखील उपस्थित केला आहे. या विमान अपघातावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केले. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शब्द दिला आहे की, या सगळ्याची ते चौकशी करतील. रोहित पवारांची अस्वस्थता सहाजिक आहे. त्याने अतिशय पारदर्शकपणे प्रश्न मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊन, पारदर्शक चौकशी करतील. त्यामुळे या चौकशीची वाट पाहू, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. तसेच रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेत पूर्व विदर्भातल्या नेत्याचं नाव घेतलं आहे. मात्र त्याबद्दल मला माहिती नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.