राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विविध राजकीय दावे-प्रतिदावे सुरू असतानाच बारामतीत महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीतील ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार, प्रतिभा पवार, शरद पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार तसेच विद्या प्रतिष्ठानचे काही विश्वस्त देखील उपस्थित आहेत.
या बैठकीबाबत आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित दादा मोठे नेतृत्व होते, जिथं त्यांचे उमेदवार आहेत, तिथं लोकांनी सहकार्य करावे, 28 तारखेपासून कोणतेही राजकिय चर्चा झाली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर आमच्या परिवारामध्ये पवार साहेब हे नेहमीच केंद्रबिंदू ठरलेले आहेत, राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेब यांचे कार्य मोठं होतं, सामाजिक दृष्टिकोनातून कार्य मोठं होतं आणि परिवाराला जेव्हा केव्हा अडचणी आल्या तेव्हा पवारसाहेब भक्कमपणे बरोबर उभे होते. अजित दादा देखील जेव्हा केव्हा अडचण आली तेव्हा परिवारासोबत उभे राहिलेले आहेत, आज दादा नसताना पवार साहेबांचा मार्गदर्शन जसं पूर्वी मिळत होतं तसंच आता सुद्धा ते मिळत आहे.
आमच्या सर्वांचच मत आहे की, चांगलं स्मारक अजितदादांच्या नावाचं असावं, त्यादृष्टीन जागा कोणती जिथे लोकांना येता येईल, बघता येईल, दर्शन घेता येईल आणि काकांचं काम हे 35-40 वर्षातील राजकारणाचं होतं, त्याबाबत त्यांचं म्युझियम देखील चांगल्या पद्धतीचं व्हावा अशी लोकांची इच्छा आहे, परिवाराची इच्छा आहे, मग ते बारामती शहरांमध्ये असावं की दुसरीकडे कुठे असावं, याबाबतच्या सर्व चर्चा त्या ठिकाणी झाल्या आहेत, पुढच्या काही दिवसात योग्य असा निर्णय परिवाराकडून आणि त्या संस्था आहेत, ज्या सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्या सर्व त्या संस्थेचे प्रमुखांनी, ट्रस्टी आहेत, त्यांच्याकडून पुढच्या काही दिवसांमध्ये घोषणा होईल, असं वाटतंय, असं हे पुढे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच 28 दिवसात तारखेपासून परिवारात राजकीय कसलीही चर्चा झालेली नाही आणि आम्ही सुद्धा विनंती केली आहे की, आम्हाला एखादी राजकीय भूमिका घेणे, या दुःखद काळामध्ये भावनिक दृष्टिकोनातून थोडसं अवघड जात आहे, नऊ तारीख होऊन जाऊ द्या, मग स्पष्टपणे या संदर्भात बोलता येईल. शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या, त्या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत, युती होईल किंवा विलीनीकरण होईल, नं होईल, यावर मी भाषा करण्या इतका मोठा नाही. फक्त जे काही राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप चर्चा, जे काही महाराष्ट्रात सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी दुःख वाटतं आहे, अजित दादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काही याच्याबद्दल कोणी चर्चा दुर्दैवाने करत नाही, चर्चा दुसरीकडे कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप मोठ-मोठ्या नेत्यांनी दिले आहे, हे पाहून परिवारातला एक व्यक्ती म्हणून वाईट वाटत आहे, असंही रोहित पवार पुढे म्हणालेत.