राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यामागे काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा ससेमिरा सुरू असून आज पुन्हा एकदा ईडीकडून रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईची बातमी वाचली आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? असा उपरोधिक सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
यावेळी रोहित पवार म्हणाले की, "माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईची बातमी वाचली आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं की, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत," अशा शब्दांत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे.
दरम्यान, रोहित पवारांशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्यावर कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ईडीने जप्त केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची किंमत ही सुमारे ५० कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच या प्रकरणामध्ये ईडीने सुमारे १६१ एकर जमीनही जप्त केली आहे.