नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच नाशिक शहरातील काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ युवा पदाधिकारी व प्रभाग क्रमांक १६ चे माजी नगरसेवक राहुल अशोक दिवे तसेच महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व माजी नगरसेविका आशाताई तडवी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे सादर केला आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे नाशिक शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात हे नेते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक तयारी, युती संदर्भातील अस्पष्ट भूमिका तसेच प्रभागनिहाय उमेदवार निवडीबाबत स्वातंत्र्य न दिल्याची नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल दिवे व आशाताई तडवी यांनी काँग्रेस पक्षापासून फारकत घेतल्याचे बोलले जात आहे.
या संदर्भात माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणत्या पक्षासोबत युती करणार, याबाबत स्पष्टता नाही. तसेच प्रभागात कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार उमेदवार ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. या व इतर अनेक कारणांमुळे आम्ही पक्षावर नाराज होतो.” पुढे ते म्हणाले की, कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवण्यात येणार असून कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय सामूहिकरित्या घेतला जाईल.
या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला नाशिक रोड व नाशिक शहर परिसरात मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच राहुल दिवे यांचे बंधू, माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सध्या ते प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपाचे इच्छुक उमेदवार म्हणून सक्रिय प्रचारात सहभागी झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता राहुल दिवे व आशाताई तडवी कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतात, याकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणात आणखी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.