राज्यभरात गेल्या दीड महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांची पिकं डोळ्यांदेखत आडवी झाली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सरकारवर दबाव वाढतोय .
'आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा 9.5 लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा एकूण 40 लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय . x माध्यमावर पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फटकारलंय . सोबत त्यांनी या संदर्भातील ई - निविदाही जोडलीय .