मुंबई : महाराष्ट्र हे देशाच्या विकासात मोठं योगदान देत देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आहे. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रातील गुंतवणुकीकडे देशाचे लक्ष लागलेले असते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक यावी, उद्योगधंदे वाढावेत आणि रोजगारनिर्मित्ती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच, आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार म्हणून कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने धवसे यांची नेमणूक करण्यात आल्याचे सांगितले जाते.
गेल्या 11 वर्षांपासून धवसे हे फडणवीसांचे विश्वासू अधिकारी आहेत. यापूर्वी धवसे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता, महाराष्ट्रातील गुंतवणुकीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
कोण आहे कौस्तुभ धवसे?
दादरमध्ये जन्मलेले आणि अंधेरीत वाढलेले धवसे हे डी.जे. संगवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पदवीधर असून, एस.पी. जैन संस्थेतून पीजीडीएम आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथून पब्लिक पॉलिसी डिग्री घेतलेली आहे. महाराष्ट्र शासनात पारंपरिक नोकरशाहीबाहेरून आलेल्या धवसे यांनी 2014 पासून वरिष्ठ पदांवर सेवा बजावली असून, त्यांची ही नियुक्ती अशा व्यावसायिकाची प्रशासकीय शिखरापर्यंत झालेली दुर्मिळ आणि प्रभावी वाटचाल आहे. हे पद राज्य सरकारच्या प्रशासनात अशा गैर-सेवा तज्ज्ञाने गाठलेले सर्वोच्च स्तर मानले जात आहे.