मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आगमन झाले. यानंतर दोघेही रामकुंडावर आले. आणि त्यानंतर याठिकाणी त्यांनी सुरुवातील रामकाल पथाची पाहणी केली.
श्री काळाराम मंदिर, रामकुंड विकास आणि रामकालपथाच्या भव्य विकासकामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीवत पूजा करून सिंहस्थ कामाचे भूमिपूजन केले. यावेळी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पहिल्या टप्प्यातील ४४ कामांच्या एकूण ५,६५७. ८९ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. या विकासकामांमुळे नाशिकचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक तेजस्वी होईल, असा विश्व व्यक्त करण्यात आला.
यावेळी सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सिंहस्थ प्राधिकरण आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, एनएमआरडीचे आयुक्त जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, दिलीप बनकर, राहुल आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.