नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथे पोलीस व्हॅनला अपघात झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी पोलीस व्हॅनला एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात इंदिरानगर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेले दोन संशयित जखमी झाले आहेत. इंदिरानगर पोलिसांची व्हॅन शनिवारी २ वाजता द्वारका चौकातून आडगावकडे जात असताना पाठीमागून आलेल्या शिंदखेडा आगाराच्या एसटी बसवरील संशयित चालक विकास वैजनाथ जायभाये याने जोरदार धडक दिली.
या अपघातात व्हॅनमधील गुन्ह्यात अटक केलेले संशयित भिमराव कोंडीबा वाघमारे व रविंद्र हरिदास अडांगळे यांना दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत दोघांनाही किरकोळ मार लागल्याचे समोर आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
या प्रकरणी पोलीस व्हॅनचे चालक हवालदार सौरभ माळी यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना पुन्हा ताब्यात घेतले जाणार असून, अपघातात व्हॅनचे नुकसान झाले आहे. तपास हवालदार डी. एस. रेहरे करत आहेत.