सोन्यासोबत आता चांदीनेही बाजारात मोठी उसळी घेतली आहे. सर्वमान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. जागतिक राजकारणातील अनिश्चितता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कमोडिटी बाजारात आज मोठा भूकंप झाला आहे. सोमवारी वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले. चांदीने ३ लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार केला असून सोन्याने १,४५,५०० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे.
सोमवारी व्यवहार सुरू होताच 'एमसीएक्स'वर सोन्याच्या फेब्रुवारी फ्युचर्समध्ये तब्बल ३,००० रुपयांची वाढ झाली. सोन्याने १,४५,५०० रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला. दुसरीकडे, चांदीमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. मार्च फ्युचर्समध्ये चांदी तब्बल १३,५५० रुपयांनी (५%) वधारून ३,०१,३१५ रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर पोहोचली.
या दरवाढीमागे जागतिक भू-राजकीय तणाव हे मुख्य कारण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरून युरोपीय देशांवर नवीन 'टॅरिफ' (व्यापार शुल्क) लावण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता बळावली असून गुंतवणूकदार शेअर्समधील पैसा काढून सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोने-चांदीमध्ये गुंतवत आहेत.