सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! सोने - चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण
सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! सोने - चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीचे दर दररोज नवा विक्रम प्रस्थापित करत होते. खासकरून चांदीचे दर हे गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढले होते. मात्र शुक्रवारपासून सोने आणि चांदी दोन्हीच्या दरांत घसरण सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने दरवाढीचे रेकॉर्ड होत होते, त्याच पद्धतीने दर कोसळण्याचेही रेकॉर्ड व्हायला लागले आहे. 

काही तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीमध्ये विक्री वाढली तशी काही शॉर्ट सेलर्सलनं एंट्री केली आणि ट्रेडिंग दरम्यान चांदीला शॉर्ट केलं. यामुळं चांदीच्या दरात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी आणि धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळाली. यामुळं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम पाहायला मिळाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या जागी पसंतीच्या व्यक्तीची निवड करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ज्यामुळं डॉलर मजबूत झाला असून याशिवाय काही ठिकाणी जागतिक तणाव कमी झाला आहे. सोने आणि चांदीतील घसरणीमुळं सिल्वर आणि गोल्ड ईटीएफच्या दरात मोठी घसरण झाली. शेअर बाजार बंद होईपर्यंत सिल्वर आणि गोल्ड ईटीएफमध्ये  20 टक्क्यांची घसरण झाली.  

शनिवारी जळगावात सोन्याच्या भावात तब्बल १३ हजार रुपयांची, तर चांदीच्या भावात ६० हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळे शनिवारी  जीएसटी वगळता सोन्याचे दर १ लाख ५५ हजार रुपयांवर, तर चांदीचे दर २ लाख ७८ हजार रुपयांवर आले आहेत. उत्तर महाराष्ट्राचे मुख्य सुवर्ण केंद्र मानल्या जाणाऱ्या जळगावमध्ये शनिवारी सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घट पाहायला मिळाली. 

शुक्रवारच्या दरांची तुलना केली असता, नागपूर सराफा बाजारात ३० जानेवारी रोजी स्टँडर्ड सोन्याचा (९९.५) विक्री दर १ लाख ७४ हजार १०० रुपये होता. २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना १ लाख ६१ हजार ९०० रुपये मोजावे लागत होते, तर १८ कॅरेटचे दर १ लाख ३४ हजार १०० रुपये होते. चांदीच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शुक्रवारी चांदीचा विक्री दर ३ लाख ८३ हजार ३०० रुपये प्रति किलो इतका होता. दागिने घडवण्यासाठी लागणाऱ्या चांदीचा दर ३ लाख ७९ हजार ५०० रुपये होता.

टीप - वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.
इतर बातम्या
Join Whatsapp Group