नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले 13 तोळे सोन्याचे व दोन किलो चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेल्याची घटना टाकळी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संदीप भीमाशंकर जानमाळी (रा. सहदेव बंगला, टाकळी रोड) यांच्या राहत्या बंगल्याचे मेन गेट व मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा कोणी तरी अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर फिर्यादी व त्याच्या आईच्या बेडरूममध्ये लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यात असलेली 65 हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची अंगठी, 50 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे झुबे, 1 लाख 25 हजार रुपये किमतीच्या तीन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या, 50 हजार रुपये किमतीची एक तोळ्यांची सोन्याची चेन, 50 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे कानातील जोड व 50 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र, 50 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र व डोरले, 70 हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र, 80 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे पेंडल, 90 हजार रुपये किमतीच्या अडीच तोळ्यांच्या लहान मुलांच्या सोन्याच्या 22 अंगठ्या, 20 हजार रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताम्हण, 20 हजार रुपये किमतीच्या 200 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वाट्या, 10 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची चांदीची निरांजन, 10 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम चांदीचे दोन चमचे, 20 हजार रुपये किमतीचे 200 ग्रॅम चांदीचे करंडे, 25 हजार रुपये किमतीचा 250 ग्रॅम वजनाचा चांदीचा कमरपट्टा, 25 हजार रुपये किमतीचे 250 ग्रॅम वजनाचे 5 नग चांदीचे पैंजण, 10 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम चांदीचे लहान मुलांचे कडे, 10 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची चांदीची समई, 15 हजार रुपये किमतीचे दीडशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन ग्लास, 20 हजार रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाचे चांदीचे नग जोडवे व 30 हजार रुपये किमतीची रोकड असा एकूण 8 लाख 95 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.