सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींचा भडका उडाला असून गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. जागतिक तणाव आणि इराणमधील अस्थिरतेचा थेट फटका भारतीय बाजाराला बसला असून, आज चांदीने २,००० रुपयांची मोठी उसळी घेतली आहे. सलग तिसऱ्या दिवशी दरवाढीचा सत्र कायम राहिल्याने ऐन लग्नसराईत सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
सोनं-चांदीच्या दरांनी आजही तेजीचा ट्रेंड कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः चांदीच्या दरात २,००० रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. ८ मे २०२६ रोजीची ही भाववाढ गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. चांदीच्या दरात २००० रुपयांची वाढ झाली असताना दुसरीकडे ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरातही तेजी दिसून आल्याने सामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि इराणमधील तणावाचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शुक्रवारी (८ मे) सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५३९ रुपयांनी वाढून १,५२,८०० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात तब्बल २०५३ रुपयांची वाढ होऊन ती २,६०,५९३ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
प्रमुख शहरांमधील आजचे भाव (२४ कॅरेट):
मुंबई/पुणे: १,५३,०१० रुपये (प्रति १० ग्रॅम)
दिल्ली: १,५३,१६० रुपये (प्रति १० ग्रॅम)
चेन्नई: १,५३,८४० रुपये (प्रति १० ग्रॅम)
बेंगळुरू: १,५३,०१० रुपये (प्रति १० ग्रॅम)
चांदीचे दरही सुस्साट...
चांदीच्या दरात आज मोठी तेजी दिसून आली आहे. किरकोळ बाजारात चांदी ७,००० रुपयांच्या वाढीसह २,६१,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चांदीने ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता, त्यामुळे आताच्या वाढीकडे विश्लेषक खरेदीची संधी म्हणून पाहत आहेत.
सोनं आणखी महागणार?
बाजार विश्लेषकांच्या मते, सोन्यासाठी १,४७,५०० रुपयांची पातळी हा मजबूत 'सपोर्ट झोन' आहे. इथून पुढे सोने १,६१,००० ते १,६५,००० रुपयांपर्यंत मजल मारू शकते. त्यामुळे किमतीत होणारी थोडीफार घट ही गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी ठरू शकते.