२४ एप्रिल २०२६
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आणि जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय सराफा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात घसरण झाली असून, चांदीच्या किमतीत प्रति किलो २,७०० रुपयांची लक्षणीय कपात झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे आणि शस्त्रसंधीबाबतच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी 'थांबा आणि पहा' अशी सावध भूमिका घेतल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे.
त्यामुळे राष्ट्रीय राजधानीच्या, अर्थात दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी बाजार बंद होताना चांदीचा भाव प्रति किलो 2.55 लाख रुपयांवर पोहोचला, तर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.57 लाख रुपयांवर स्थिर होता. एमसीएक्सवरही दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये असाच कल दिसून आला. बुधवारी रात्री उशिरा सोने आणि चांदी तोट्यात व्यवहार करत होते, त्यामध्ये चांदीच्या भावातील घसरण अधिक तीव्र होती. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, मागील सत्राच्या अखेरीस 24 -कॅरेट सोन्याचा भाव (3% जीएसटी आणि घडणावळीचे शुल्क वगळून) प्रति 10 ग्रॅम साठी 1 लाख 51 हजार 060 रुपये इतका होता. दरम्यान, गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, मागील सत्रात 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,53,550 रुपये तर चांदीचा भाव 5 हजारांनी घसरून प्रति किलो 2,60,000 रुपयांवर आला होता.
सराफा बाजारात नरमी
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी बाजार बंद होईपर्यंत राष्ट्रीय राजधानीत चांदीचा भाव (सर्व करांसहित) 2700 रुपयांनी घसरून 2.55 लाख रुपये प्रति किलो झाला. त्याचप्रमाणे, 24-कॅरेट सोन्याचा भाव (सर्व करांसहित) 300 रुपयांनी घसरून 1,57,000रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला होता. .
काय सांगतात जाणकार?
वरिष्ठ विश्लेषकांच्या सांगण्यानुसार, “बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. अमेरिका-इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे नियोजन अयशस्वी ठरले. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवली. मात्रम प्रगतीच्या अभावामुळे अनिश्चितता वाढली असून त्यामुळेच कच्च्या तेलाला आणि डॉलरला आधार मिळाला, पण मौल्यवान धातूंवर मात्र याचा नकारात्मक परिणाम झाला.” असं ते म्हणाले.
या घटकांवर असेल सर्वाधीक लक्ष ?
या घडामोडींवर बाजारातील भागीदारांची प्रतिक्रिया येत राहील. मात्र जोपर्यंत अधिक स्पष्ट संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत किमतींच्या हालचालींमध्ये सावध भूमिका तसेच ‘थांबा आणि पहा’ दृष्टिकोन दिसून येण्याची शक्यता आहे. “सीझफायर कायम राहण्याच्या आशेमुळे सोन्याची सुरुवात तेजीने झाली आणि ते सकारात्मक पातळीवर राहिलं होतं. मात्र शस्त्रास्त्रसंधी वाढवण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी परस्परविरोधी विधान केली त्यामुळे बाजारात अस्थिरता आहे,” असे एलकेपी सिक्युरिटीजच्या कमोडिटीज अँड करन्सीज, रिसर्च अँड ॲनालिसिस विभागाचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी यांनी सांगितलं. जागतिक घडामोडींमधून जे संमिश्र संकेत मिळत आहेत, त्यामुळे सर्व मालमत्ता वर्गांमध्ये अनिश्चितता निर्माण होत आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठे, पण अल्पकालीन चढ-उतार होत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
Copyright ©2026 Bhramar