नवीन नाशिक (प्रतिनिधी) :- येथील उत्तमनगर येथे एका गिरणीच्या पाठीमागे बेवारस दोन पिशव्या आढळून आल्या.याबाबत येथील रहिवाशांनी काँग्रेसचे पदाधिकारी माणिक जायभावे यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी त्वरित याबाबतची माहिती अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही पिशव्या उघडून बघितल्या असता त्याच्यात 13 किलो चांदी व पितळ असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल काही चोरट्यांनी भद्रकाली हद्दीत चोरून उत्तमनगरला आणून टाकल्याची चर्चा आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की उत्तमनगर येथील काँग्रेसचे पदाधिकारी माणिक जायभावे यांच्या गिरणीच्या पाठीमागे दोन बेवारस पिशव्या ठेवलेल्या आहेत, असा जायभावे यांना फोन आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिशव्या उघडून पाहिल्या असता त्यांच्यात 13 किलो चांदी व पितळ असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून संशयितांनी त्या ठिकाणी ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा मुद्देमाल अंबड पोलिसांनी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या सुपूर्द केला आहे. या घटनेतील संशयित फरारी असून, मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या मुद्देमालावर अन्य चोरट्यांची नजर गेली असती, तर हा मुद्देमाल त्या ठिकाणाहून नव्याने चोरीस जाण्याची भीती होती; मात्र काँग्रेसचे पदाधिकारी माणिक जायभावे यांच्यामुळेच हा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. त्यामुळे त्यांचे सिडको परिसरातून कौतुक होत आहे.