नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे येथे नोकरीस असल्याचे खोटे सांगून पहिले लग्न झाले असतानाही ती माहिती लपवून महिलेशी लग्न करून वेगवेगळी कारणे सांगून महिलेची सुमारे 45 लाख रुपयांची फसवणूक करणार्या पतीसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, की फिर्यादी ही सातपूर परिसरात राहते. आरोपी महेश दिलीप वडार (वय 32, रा. पुणे, मूळ रा. कोल्हापूर) याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून पुण्याच्या डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीत नोकरीस असल्याचे खोटे सांगून पहिले लग्न झाले असतानादेखील ती माहिती लपवून फिर्यादीसोबत लग्न केले.
फिर्यादीची परवानगी न घेता तिच्याकडील सहा तोळे वजनाचे व 6 लाख 76 हजार 796 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्वत:च्या नावे गहाण ठेवले, तसेच फिर्यादीचा मोबाईल नंबर वापरून वेगवेगळ्या अॅपद्वारे ऑनलाईन लोन घेतले, तसेच आरोपी महेश वडार व डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी येथील अॅडमिन डिपार्टमेंटमध्ये नेमणुकीस असलेले त्याचे मित्र आरोपी शुभम् व अजय यांनी कॉलेजमध्ये नोकरी व कँटीन चालू करण्याचे टेंडर मिळवून देतो, असे फिर्यादीसह तिच्या नातेवाईकांना व ओळखीच्या लोकांना आमिष दाखवून फिर्यादीचा भाऊ यांची 10 लाख 5 हजार 585 रुपये, फिर्यादीचा धाकटा भाऊ 6 लाख 82 हजार 100 रुपये, फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा यांच्याकडून 9 लाख 61 हजार 600 रुपये, फिर्यादीच्या भावाकडे काम करणार्या मित्रांकडून 1 लाख 90 हजार व 2 लाख 7 हजार 300 रुपये, फिर्यादीच्या दाजीकडून 5 लाख 97 हजार 85 रुपये व फिर्यादीच्या मामाच्या मुलाकडून 1 लाख 34 हजार रुपये अशी रक्कम वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात घेतली.
या सर्वांना त्यांच्या नावे असलेले डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी येथील आयकार्ड, शिपाई, क्लर्क, प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटरपदाकरिता नियुक्त केलेले पत्र, फिर्यादीच्या नावे, तसेच इतरांच्या नावे डी. वाय. पाटील येथे चालू केलेल्या कँटीनचे खोटे करारपत्र व कँटीनचे आयकार्ड, खोटे बिल, चेक्स अशी खोटी कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे सांगून फिर्यादीसह तिच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून आरोपी महेश वडार व त्याच्या साथीदारांनी एकूण 44 लाख 54 हजार 466 रुपयांची रक्कम व 6 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केली.
हा प्रकार सन 2023 ते दि. 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत श्रमिकनगर, सातपूर व पुणे येथे घडला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.