नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : ऑनलाईन ज्वेलरी मार्केटिंगमध्ये अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून दोन जणांची 60 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे ३९ वर्षीय असून, ते नाशिक येथे राहतात. फिर्यादी यांच्याशी एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून एका अज्ञात इसमाने संपर्क साधला. कुकॉईन शेअर मार्केट ट्रेडिंग करून अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी यांना 53 लाख 68 हजार रुपये बँक खात्यात भरणा करण्यास सांगितले, तसेच साक्षीदार नारायण गोपाळराव आगरकर यांना टेलिग्राम अॅपवर टेलिग्राम आयडीवरून एक लिंक पाठविली.
त्या लिंकद्वारे ऑनलाईन ज्वेलरी मार्केटिंगद्वारे अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून त्यांनाही 6 लाख 31 हजार 344 रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. अशा पद्धतीने अज्ञात भामट्याने फिर्यादी व साक्षीदाराची एकूण 59 लाख 99 हजार 344 रुपयांची रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून बँकेत भरणा करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार डिसेंबर 2024 ते 21 सप्टेंबर 2025 यादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.