नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया या शासकीय संस्थेकडून अधिकारी बोलत असल्याचे सांगून एका इसमाला 18 लाख 40 हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास भाग पाडून खंडणी वसूल करणार्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादींना व्हॉट्सअॅप क्रमांकावरून एक फोन आला. डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया या शासकीय संस्थेकडून महावीर सिंग अधिकारी बोलत असल्याचे सांगून स्वत:ची ओळख करून दिली. फिर्यादीच्या मोबाईल सिम कार्डाचा वापर करून लोकांना धमकी, खंडणी व अश्लील व्हिडिओ कॉल जात असल्याची तक्रार कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस, ईडी व एनआयए अशा तीन एजन्सी तपास करीत असून, मुंबई पोलीस दलातील अधिकारी क्राईम ब्रँचमार्फत तपास करीत आहेत.
कॅनरा बँकेत फिर्यादीच्या नावे उघडलेल्या खात्यामध्ये मनी लॉण्डरिंगचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचे अटकवॉरंट काढले असून, त्याबाबत व्हॉट्सअॅपवर मुंबई पोलिसांचा लोगो चिन्ह असलेली नोटीस पाठवून त्याबाबत चौकशी चालू असून, त्यांच्या शाखेचा पोलीस स्टाफ फिर्यादीच्या घराच्या आजूबाजूला लक्ष ठेवून असल्याचे त्या तोतया अधिकार्याने सांगितले, तसेच मनी लॉण्डरिंग करणार्या आरोपीकडून जिवाला धोका आहे. त्यांचा फोन सर्व्हेलन्सवर आहे. ही माहिती गोपनीय ठेवून कुटुंबीय किंवा स्थानिक पोलिसांना सांगू नये. ही चौकशी होईपर्यंत त्यांच्या खात्यातील व्यवहाराची पूर्ण तपासणी होईपर्यंत ही खबरदारी घ्यावी, असे सांगितले.
त्याचप्रमाणे आरोपीने सांगितलेले पैसे भरले नाहीत, तर फिर्यादीसह त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना धोका असल्याचे आरोपीने व्हॉट्सअॅप फोनद्वारे सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना फोन करून इंटरनेट, बँक व वॉलेट खाते यांचा वापर करून 18 लाख 40 हजार रुपयांची रक्कम बँक खात्यामध्ये भरण्यास भाग पाडून फिर्यादीकडून खंडणी उकळली. ही बाब लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.