अजित पवारच नाही भारताच्या इतिहासात देशाने यापूर्वी विमान अपघातात  'हे' ७ बडे नेते गमावले
अजित पवारच नाही भारताच्या इतिहासात देशाने यापूर्वी विमान अपघातात 'हे' ७ बडे नेते गमावले
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत. संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळ व्यक्त करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याआधी भारताच्या इतिहासात ७ मोठ्या नेत्यांचा मृत्यू विमान किंवा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झाला आहे. यापैकी ३ (बलवंतराय मेहता, वाय. राजशेखर रेड्डी आणि डोरजी खांडू ) मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते. 

प्रशासनावर वचक, राजकारणात दबदबा, कशी होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकीर्द

बलवंतराय मेहता – बलवंतराय मेहता हे विमान अपघातात मृत्यू पावणारे पहिले मोठे राजकीय नेते होते. १९६३ ते १९६५ पर्यंत गुजरातचे ते मुख्यमंत्री होते.  १९६५ च्या युद्धादरम्यान कच्छच्या रणात निरीक्षणासाठी उड्डाण करत असताना पाकिस्तानने त्यांचे विमान पाडले. या दुर्घटनेत केवळ बलवंतराय मेहताच नाही तर त्यांची पत्नी, तीन कर्मचारी, एक पत्रकार आणि दोन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला होता. 

संजय गांधी – काँग्रेसचे तत्कालीन खासदार संजय गांधी हे २३ जून १९८० रोजी दिल्लीतून विमान प्रवासाला निघाले होते. संजय यांना विमान उडवण्याचा शौक होता. सकाळी १० वाजता विमान घेऊन उड्डाण केल्यानंतर एक स्टंट दाखवताना त्यांचे विमान क्रॅश झाले. संजय यांच्यासोबत त्यांचे सहप्रवासी सुभाष सक्सेना यांचाही या अपघातात मृत्यू झाला होता. 

माधवराव सिंधिया – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांचा देखील मृत्यू विमान अपघातात झालेला आहे. सिंधिया हे ३० सप्टेंबर २००१ रोजी कानपूरच्या एका रॅलीसाठी जात होते. दरम्यान मैनपुरीजवळील मोटागाव येथे त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात सिंधिया यांचा मृत्यू झाला. तेव्हा सिंधिया ५६ वर्षांचे होते.

जी.एम.सी. बालयोगी – जी.एम.सी. बालयोगी म्हणजेच गंती मोहना चंद्र बालयोगी यांचा मृत्यू लोकसभा अध्यक्ष पदावर असताना झाला. २००२ मध्ये आंध्र प्रदेशातील एका कार्यक्रमासाठी जाताना त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात बालयोगी यांचे सुरक्षा अधिकारी डी. सत्य राजू आणि पायलट कॅप्टन जी.व्ही. मेनन यांचाही मृत्यू झाला.

वाई. राजशेखर रेड्डी – आंध्र प्रदेशात २००९ मध्ये आणखी एक अपघात झाला होता. यावेळी मुख्यमंत्री वाई. राजशेखर रेड्डी यांचा बळी गेला. सप्टेंबर २००९ मध्ये रेड्डी आपल्या अधिकाऱ्यांसह नल्लामाला भागातून जात होते. त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. काही माध्यमांमध्ये नक्षलवाद्यांनी हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला गेला, मात्र सरकारने तेव्हा हा दावा फेटाळला होता.

डोरजी खांडू – अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री डोरजी खांडू यांचाही २०११ मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. खांडू तेव्हा ५६ वर्षांचे होते. खांडू तवांगहून राजधानी इटानगरकडे जात होते. तेव्हा त्यांचे विमान बेपत्ता झाले आणि नंतर क्रॅश झाल्याचे समोर आले.

विजय रुपाणी – १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले. या विमानातून विजय रुपाणी प्रवास करत होते. रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. संध्याकाळी मृतकांची यादी जाहीर झाली तेव्हा त्यात रुपाणी यांचे नाव होते. रुपाणी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनला जात होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group