अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं हे पहिलच अधिवेशन आहे. त्यामुळे सभागृहात त्या काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता अशातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या तीनही खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देण्यात आल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेली क्रिडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्यांक खातं तसेच राज्य उत्पादन शुल्क खातं हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलं. तर अर्थखातं हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेलं.
दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या तीनपैकी एकाही खात्याची उत्तरं या अधिवेशनात त्या स्वतः देणार नाहीत. त्यांच्या खात्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याची उत्तरं देण्याची जबाबदारी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देण्यात आली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.