उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा झाला. पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी भाषण केलं. यावेळी त्या भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा, असं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.
दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाही, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की बारामतीची पोटनिवडणुक होईल. अजितदादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीकरांकडे बघूनच मला धीर आला, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितले.
बारामतीच्या प्रत्येक वास्तुला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्यांचे विक्रेम मोडून काढले आहेत. ही निवडणूक नाही, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन, असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी यावेळी दिलं.
बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही निवडणूक ही माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर (थोडी अधिक) मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितले.