बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 437 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील या इच्छुकांमध्ये नव्या चेहऱ्यांची विशेषत: तरुणांची संख्या मोठी होती. यामध्ये काही महिलांनी देखील मुलाखती दिल्या.
या ऊस गळीत हंगामात छत्रपती कारखान्याच्या ज्या सभासदांनी छत्रपती कारखान्यांमध्ये ऊस दिलेला नाही, अशा सभासदांची यादी आपण मागून घेणार आहे. त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, ज्या सभासदांचा ऊस धंदा चांगला आहे, ज्यांना खरोखर कारखान्याची आस्था आहे, त्यांचा सार्वजनिक कार्यात सहभाग आहे, अशा उमेदवारांनाच संधी दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ऊस वाहतूकदार तसेच कारखान्याला इतर वस्तू पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी दिली जाणार नसल्याचेही यांनी स्पष्टपणे नमूद केले.
दरम्यान, छत्रपती कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये आर्थिक अडचणीतून बाहेर काढायचा आहे. त्यामुळे आपापसातील हेवे-दावे बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
श्री छत्रपती कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत दोन मे पर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर श्री जय भवानी माता पॅनलमध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती बारामती येथील इम्पेरियल बँक्वेट हॉल या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
छत्रपती कारखान्याच्या सर्व गटातील इच्छुक उमेदवारांसह त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री पवार व क्रीडामंत्री भरणे यांच्यासह कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व विद्यमान अध्यक्ष प्रशांत काटे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यावेळी उपस्थित होते. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपली ओळख सांगत असताना सध्याचा व्यवसाय, आर्थिक उत्पन्नाची साधने, उसाचे क्षेत्र, दरवर्षी कारखान्याला जाणारा ऊस तसेच इतर जोड व्यवसाय याची माहिती दिली.
संचालक म्हणून प्रयत्न करू
तसेच कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक म्हणून प्रयत्न करू, अशी ग्वाही इच्छुकांनी दिली. यावेळी पवार यांनी इच्छुक उमेदवारांची इत्यंभूत माहिती घेतली. यामध्ये महिलांचे सासर-माहेर याचीही माहिती घेतली.
जाचक यांना अध्यक्षपदासाठी संधी मिळणार
मुलाखती संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित इच्छुकांसह इतर सभासदांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पृथ्वीराज जाचक यांना अध्यक्षपदासाठी संधी दिली जाणार आहे. कारखाना कोणत्याही परिस्थितीतून-अडचणीतून बाहेर काढला जाईल, यासाठी प्रत्येकाने साथ द्यावी, उमेदवारी न मिळाल्याने कोणी नाराज होऊ नये, त्यांना इतर ठिकाणी संधी दिली जाईल. उपाध्यक्ष पद इतर गटातून दिले जाणार आहे.