अजित पवार गटाला धक्का बसला आहे. मीरा–भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक अत्यंत दु:खद घटना घडली आहे. काल ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जावेद पठाण (वय ६६) असं मृत उमेदवाराचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद पठाण यांनी सकाळी १० ते ११ या वेळेत प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मीरा रोड येथील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे मीरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.