एक मोठी बातमी समोर आली आहे. गुन्हेगारी कृत्याबद्दल गुन्हे दाखल असल्याने महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवारासह काझी टोळीतील आठ जणांवर तडीपारीची कारवाई गुरूवारी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या शुक्रवारी मिरज दौरा असून या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
उद्या ( 9 जानेवारी) मिरजमध्ये अजित पवार यांची सभा होत असताना या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये एकमेकावर गेल्या काही दिवसापासून जोरदार टीका होत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेतील प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवणारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काझी आणि त्यांच्या टोळीतील एकूण आठ जणांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या हद्दपार केलेल्यांमध्ये टोळीप्रमुख शोएब ऊर्फ मोहमद युसूफ साहेबपीर चमनमलीक काझी (वय ३४), मतीन ऊर्फ साहेबपीर चलनमलीक काझी (वय ३२), अक्रम महंमद काझी (वय ४२), रमेश अशोक कुंजीरे (वय ३९), अस्लम महंमद काझी (वय ४८), आझम महंमद काझी (वय ३९), अल्ताफ कादर रोहीले (वय ३६) आणि मोहसिन कुंडीबा गोदड (वय २६) यांचा समावेश आहे.
याशिवाय, कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार जणांना सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये सुरज ऊर्फ रमजान मौला शेख (वय ४४), शब्बीर मौल्ला शेख (वय २७), सौरभ विलास जावीर (वय २०) आणि अर्जुन ईश्वरा गेजगे (वय ३५) यांचा समावेश आहे. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजाराम सोपान बोडरे (वय ४६) आणि सुदाम सोपान बोडरे (वय ४४) या दोघांनाही सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितेंद्र ऊर्फ जिच्या दगडु काळे (वय ५२), रोहीत किशोर पवार (वय १९) आणि तोट्या ऊर्फ अक्षय जितेंद्र काळे या टोळीला सांगली, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक पंकज पवार, मिरजेचे निरीक्षक किरण चौगले, कुपवाडचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे, विट्याचे निरीक्षक धनंजय फडतरे, आटपाडीचे निरीक्षक विनय बहीर, बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, गजानन बिराजदार, अविनाश पाटील, विलास मोहिते आणि दादासाहेब ठोंबरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.