राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीमध्ये त्यांच्या निरोपासाठी जनसागर उसळला असून, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. याठिकाणी अजित पवार यांचे पार्थिव काहीवेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अजित पवार यांचे अंत्यदर्शन घ्यायला आज काटेवाडीच्या ग्रामस्थांनी निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती.
अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतून रुग्णवाहिकेत चढवले तेव्हा येते उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला. हे सर्वजण अक्षरश: ओक्सोबोक्शी रडत होते. 'ओ थांबा ना... आमच्या दादांना नका नेऊ ना... पाया पडतो तुमच्या', अशी विनंती हे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ करत होते. काटेवाडीतील महिलाही अजितदादांना शेवटचा निरोप देताना प्रचंड रडत होत्या. आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता. आम्ही बहिणी अजितदादाला सलाम करतो, असे बोलताना या महिला रडत होत्या.