"अजित पवार यांना जे ओळखतात ते सांगतील की, त्यांनी कधीही भाजपच्या अजेंड्यावर काम केलं नाही. त्यांच्यावर भाजपने काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी, सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फाईल क्लिअर करून घेऊन त्यांनी पुन्हा मूळ प्रवाहात यायची धडपड सुरू केली होती, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २) माध्यमांशी बोलताना केला आहे. सुनेत्रा पवार यांनी दुःख विसरून शपथ घेतली आहे. त्यांना आता कर्तव्यासाठी बाहेर पडावं लागेल, असेही ते म्हणाले.
माध्यमांसोबत संजय राऊत यांनी विविध विषयावर भाष्य केले. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, अजित पवार यांचा पक्ष आता पवार, पाटील यांचा पक्ष राहिला नाही. तो गोयल, पटेल, मोदी, शाह यांचा पक्ष होत आहे. तो मूळ पक्ष शरद पवार यांचा आहे; पण अमित शाह यांनी तो अजित पवार यांच्या हाती दिला. महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भाजपने गिळून टाकला आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी, सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्या वरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले.
अजितदादांचा अपघात आहे की घातपात आहे, असा सवाल उपस्थित होत आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे प्रकरण साधे नाही. अजित पवार मागे फिरले असते तर भारतीय जनता पक्षाची दहशत मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी ती उघड करेन. हे त्यांनी 15 जानेवारी रोजी सांगितले आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली.
अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? सगळे देह जाळून खाक झाले. त्यांची ओळख पटवता येत नव्हती. मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.