संघासोबत जोडले जाणारे लोक हे पंतप्रधान मोदींना घाबरलेले नाहीत. राज ठाकरे यांचा खूप आदर करतो. पण ते पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरले आहेत असे मला वाटते. त्यांनी घाबरू नये. राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या जवळ जायला हवे, त्यांच्यासाठी सगळे सारखेच आहेत. पंतप्रधान मोदींना घाबरू नका असे त्यांना सांगणार आहे. महाराष्ट्रातले आहात त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. घाबरायचे असेल तर चुकीच्या कामांसाठी घाबरा, अशी टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंना उद्देशून केली होती. याला मनसे नेत्यांनी उत्तर दिले आहे.
आज मनसे नेते संदिप देशपांडे यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. त्यांनी कोश्यारींना चांगलेच सुनावले.आज जर भगतसिंग असते तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कोश्यारी यांनी पहिलं नाव बदलावं असा सल्लाही त्यांनी दिला. कालच्या कोश्यारींच्या वक्तव्यावरून मनसे नेते भडकल्याचे दिसून आले. कोश्यारींनी नाशिकमध्ये बोलता बोलता राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना कोश्यारींनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यावर आज मनसे स्टाईलने प्रतिक्रिया देण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान , भगतसिंह कोश्यारी यांच्या टीकेला संजय राऊतांनीही तीव्र शब्दांत उत्तर दिले. त्यांना नीट धोतर नेसता येत नाही, ते काय आम्हाला अक्कल शिकवतात. स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही, ते ठाकरेंना सांगतात की, मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरत आहे? तुमच्या हातात सत्ता आणि एजन्सी आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगत आहात. पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे, या शब्दांत संजय राऊतांनी टीका केली.