मुंबई : पैशाच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहेत. या संबंधी शिरसाट हे त्यांच्या वकिलांचा सल्ला घेत आहेत.
संजय शिरसाट यांच्या बेडरुममधील एक व्हिडीओ संजय राऊतांनी शेअर केला. त्यामध्ये संजय शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेली एक बॅग दिसते. शिरसाटांनी हा व्हिडीओ त्यांचा असल्याचं मान्य केलं असलं तरी त्या बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याची सारवासारव केली. त्यानंतर शिरसाट आऱोप फेटाळत असतील तर आणखी व्हिडीओ बाहेर काढू असा इशारा संजय राऊतांनी दिला.
आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ. एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अडचणीत सापडले आहेत.
शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत दोन बॅगा दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला. हा व्हिडीओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केला.
हा व्हिडीओ आपल्याच बे़डरूममधला असल्याचं शिरसाटांनी मान्य केलं. पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग असल्याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं.
दरम्यान, शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममध्ये त्यांचा हा व्हिडीओ कुणी काढला आणि तो राऊतांना कुणी पाठवला, याची चर्चा सुरू आहे.
संजय शिरसाटांना आदल्याच दिवशी आयकर विभागाची नोटीस आली होती. या निवडणुकीमध्ये त्यांच्या वाढलेल्या संपत्तीचा हिशोब त्यामध्ये विचारण्यात आल्याची माहिती आहे.