शिवसेनेची तडफदार तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली. अन त्यांनी दोन महिने समाजजीवनापासून लांब राहणार असल्याचे सांगितल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यांनी प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं सांगत थेट वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढच्या वर्षीच भेटणार असल्याचं सांगितले आहे. 
त्यांच्यापाठोपाठ आता आणखी दोन पक्षाच्या तोफ समजल्या जाणाऱ्या दोन नेत्यांची प्रकृती खालावली आहे. भाजप नेत्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणा यांच्या पायाला इजा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ही शस्त्रक्रिया केली जात आहे.पण या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना 25 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
तर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. छगन भुजबळ यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री भुजबळ यांनी उपस्थित होते. मात्र,मंत्रालयातील कामकाज आटोपल्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या कार्यालयानं भुजबळांची प्रकृती स्थिर असल्याचं कळवलं होतं. पण आता त्यानंतर आज भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचं समोर येत आहे.