एका वाहिनीचा बनावट लोगो वापरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निधन झाल्याची खोटी पोस्ट केली होती. यासाठी एका टीव्ही वाहिनीच्या लोगोचा गैरवापर देखील त्याने केला. सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही खोटी बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली.
या प्रकरणी विशेष शाखेचे अधिकारी सुनील बहारवाल यांनी तक्रार दाखल केली आहे. व्हिडिओमध्ये 'मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन' असे लिहिले होते.
बहारवाल यांनी लिंक उघडून पाहिली असता त्यात रंजनीताई बोरस्ते यांच्या निधनाची बातमी होती. मंत्री भुजबळ यांनी त्यांना यूट्यूबवर श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या मृत्यूची खोटी बातमी बनवून ती व्हायरल केली. हे कृत्य 28 जून रोजी रात्री घडले होते.
दरम्यान, जवळपास सव्वा लाख लोकांनी ही पोस्ट पाहिली. यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला. शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता होती. पोलिसांनी @Nana127tv नावाच्या युट्युब चॅनेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या चॅनेलचे डिस्प्ले नाव 'हेल्पलाइन किसान' असे आहे.