बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेज प्रताप यादव नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , तेज प्रताप यादव पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची घोषणा करतील. तेज प्रताप यांचे वडील लालू प्रसाद यांनी त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केलं आहे. त्याचबरोबर त्यांना कुटुंबातूनही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
बिहार विधानसभा निवडणुका याच वर्षी होणार आहे. तेज प्रताप यादव सध्या हसनपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांनी याआधी २०१५ ते २०२० या वर्षात महुआ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मुलगा तेज प्रताप यादव यांचं पक्षातून निलंबन केलं होतं. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आता तेज प्रताप यादव यांनी कुटुंबाच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
तेज प्रताप यादव यांचं नाव अनुष्का यादव यांच्याशी जोडलं गेलं. एकीकडे तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात सुरु आहे. दुसरीकडे तेज प्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वी अनुष्का यादव यांच्याशी असलेलं छुपं नातं सार्वजनिक केलं.
यानंतर लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केलं. तसेच त्यांनी कुटुंबातूनही बाहेर काढलं. यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.