बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुझफ्फरपूर शहराच्या मोतीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वॉर्ड-१३ मध्ये एका घराला आग लागली.घरात शॉर्ट सर्किट झाल्याने घराला आग लागली. या आगीत जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घराला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ लोक आगीत होरपळले आहेत. मृत्यू झालेले आणि आगीत जखमी झालेले लोक एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.
घटनेवेळी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचत जखमींना आगीतून बाहेर काढलं. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं. गेना साह यांच्या घराला ही आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. काही लोकांचा झोपेतच मृत्यू झाला. घरातील काही जखमींना स्थानिक आणि पोलिसांनी बाहेर काढलं.
घटनेत जखमी झालेल्या लोकांनी जवळील रुग्णालयात दाखल केलं. मृतांमध्ये ललन साह, त्यांची आई, पत्नी आणि २ मुलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर लोक त्यांच्या घरातील वीज जोडणीची तपासणी आणि दुरुस्ती करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.