कौटुंबिक वादातून भावाचे घर जाळण्यासाठी गेला; पण स्वतःच आगीत होरपळला, व्हिडीओ पहा
कौटुंबिक वादातून भावाचे घर जाळण्यासाठी गेला; पण स्वतःच आगीत होरपळला, व्हिडीओ पहा
img
वैष्णवी सांगळे
"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे ईश्वर" हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. कर्म नीट ठेवा म्हणजे तुमचेही चांगले होईल नाहीतर कर्मानुसार शिक्षा मिळेल आपण असे म्हणतो. याचाच प्रत्यय आला आहे मुनिराजूला. कर्नाटकच्या होस्कोटे तालुक्यातील गोविंदपुरा गावात राहणारा मुनिराजू याने रागाच्या भरात मोठ्या भावाचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगलाच फसला. इतका की या आगीत तो स्वतः होरपळून जळला. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून आगीचा थरार  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. . 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुनिराजू हा गेल्या ८ वर्षांपासून गावात चिट फंडचा व्यवसाय करत होता. मात्र, या व्यवसायात त्याला मोठे नुकसान झाले आणि तो कर्जाच्या विळख्यात अडकला. गावकरी पैशांसाठी तगादा लावू लागल्याने मुनिराजूने कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन विकून कर्ज फेडण्याचा प्रस्ताव ठेवला. कुटुंबाने आधीच जमिनीचा एक भाग विकून काही पैसे दिले होते, मात्र उरलेली जमीन विकण्यास मोठा भाऊ रामकृष्ण याने नकार दिला. याचाच राग मनात धरून मुनिराजूने आपल्या भावाचा घर जाळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला. 

त्याच्या नियोजनाप्रमाणे ७ जानेवारीच्या मध्यरात्री मुनिराजू पेट्रोल घेऊन रामकृष्ण यांच्या घराजवळ गेला. त्याने सुरुवातीला घराचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद केला, जेणेकरून कोणालाही बाहेर पडता येऊ नये. त्यानंतर त्याने घराच्या परिसरात पेट्रोल शिंपडण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, जशी त्याने आग लावली, तसा आगीचा मोठा भडका उडाला. दुर्दैवाने, पेट्रोल शिंपडताना काही थेंब मुनिराजूच्या कपड्यांवर आणि हातावर पडले होते, ज्यामुळे क्षणार्धात तो स्वतःच आगीच्या विळख्यात सापडला.

स्वतःला आग लागल्यानंतर मुनिराजू वेदनेने विव्हळत ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे नागरिक तातडीने मदतीला धावले. त्यांनी आग विझवून मुनिराजूला बाहेर काढले. त्याला तातडीने होस्कोटे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला बंगळुरूच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

याप्रकरणी तिरुमलशेट्टीहल्ली पोलीस ठाण्यात मुनिराजू विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे, त्याला डिस्चार्ज मिळताच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group