सध्या राज्यासह देशभरात थंडी वाढली असून या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, कानटोपी आणि शेकोटीचा वापर करत आहे. दरम्यान या शेकोटीच्याच नादात बेळगाव शहरात मोठी दुर्घटना घडली आहे.
बेळगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी चार मित्रांनी झोपण्यापूर्वी खोलीत कोळशाची शेगडी पेटवून घेतली आणि दरवाजे–खिडक्या पूर्णपणे बंद केल्या. कोळसा जळाल्यानंतर निर्माण होणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड या रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत घातक वायूमुळे खोलीतील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. झोपेत असल्याने वायूचा परिणाम लक्षात न आल्याने तिघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
रेहान माटे (वय 22), मोईन नालबंद (वय 23), सर्फराज हरपनहळ्ळी (वय 22) अशी मृतांची नावे आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर अवस्थेतील युवकाचे नाव शाहनवाज हरपनहळ्ळी (वय 19) आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटेनमुळे अमननगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेमुळे थंडीच्या दिवसांत निष्काळजीपणामुळे जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. थंडीत शेकोटी किंवा शेगडीचा वापर करताना खोली हवेशीर ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.