गाढ झोपेत असलेल्या एका कुटुंबातील तिघांसाठी शनिवारची पहाट ही काळ ठरली. मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडील एका इमारतीत झालेल्या भीषण अग्निकांडामुळे प्रचंड खळबळ माजली. या आगीत घरात झोपलेल्या तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत नागरिकांमध्ये 2 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामुळे भीतीचे वातावरण असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग नगर येथील इमारतीमधील तळ मजल्यावरील घरात आग लागली. ही घटना रात्री 3 च्या सुमारास घडली. पावस्कर कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घरातील फ्रिजचा मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच घराला आगीने वेढले.घराला प्लास्टिक शीट लावलेली असल्याने आगीचा भडका अधिकच उडाला. या आगीत संजोग पावस्कर (वडील) आणि त्यांची दोन मुले हर्षदा पावस्कर (19 वर्षे) व कुशल पावस्कर (12 वर्षे) यांचा मृत्यू झाला.
या घटनेत सुदैवाची बाब म्हणजे मुलांची आई रात्रपाळीच्या (Night Shift) कामावर गेली होती. त्या घरी नसल्यामुळे या भीषण आगीतून त्या बचावल्या आहेत. मात्र, एका रात्रीत आपले संपूर्ण कुटुंब गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
मात्र, तोपर्यंत पावस्कर कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाला होता.गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी सध्या एडीआर (ADR) दाखल केला आहे. आगीचे नेमके कारण काय होते आणि फ्रिजचा स्फोट कशामुळे झाला, याचा सखोल तपास गोरेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात येत आहे.